यवतमाळ -उमरखेड येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश प्रसारभारतीने दिले आहेत. त्यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड यांनी दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्यापूर्वी येथील मंजूर झालेले आकाशवाणी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी आज टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्यात आले.
टॉवरवर चढून प्रहारचे आंदोलन -
हे आकाशवाणी केंद्र 3 फेब्रुवारी 2015 मध्ये मंजूर झाले असून उमरखेड आणि हिंगोलीसाठी तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी प्रयत्न करून आकाशवाणी केंद्र आपल्या लोकसभा मतदारसंघात खेचून आणले. त्यापैकी हिंगोली येथील आकाशवाणी केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. तर उमरखेड येथे अजून कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यातच येथे असलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय सूचना व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. याला आता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला असून हे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याच्या अगोदर येथील मंजूर असलेले आकाशवाणी एफएम केंद्र सुरू करावे व नागरिकांना सुविधा पुरवाव्यात याकरिता प्रसार भारतीला निवेदन देऊन प्रहारने विनंती केली होती. मात्र याकडे दुर्लेक्ष केल्याने प्रहारचे कार्यकर्ते सय्यद माजिद सय्यद पाशा, अविनाश दुधे, प्रवीण इंगळे दूरदर्शन प्रशिक्षण केंद्राच्या टॉवरवर चढले होते. तसेच आंदोलना दरम्यान अंकुश पानपट्टे, अभिजित गंधेवार, विवेक जळके, मोहम्मद फयाज, शाम चैके गोपाल झाडे, मनोज कदम व आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते दूरदर्शन केंद्रावर ठाण मांडून बसले होते.