यवतमाळ - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस, सोयाबिनचा तर लागवड खर्च सुध्दा निघाला नाही. अशा परीस्थितीत पिकविमा कंपन्यांनी बोटावर मोजण्याइतक्यात शेतकऱ्यांना पीकविमा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, अन्यथा पिकविमा कंपनीला घेराव घालू, वेळ पडल्यास न्यायालयातही जाऊ असा इशारा शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दिला आहे.
पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास पीकविमा कंपनीला घेराव; अन्यथा न्यायालयाचे दार ठोठाऊ
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. मात्र, कित्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी खासदार भावना गवळी यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला आहे.
नुकसानीचा दावा दाखल करण्यास शेतकरी असमर्थ-
विमा कंपनीने सोळा तालुक्यात फक्त 100 प्रतिनिधींची सर्वेक्षण करण्याकरीता नेमणूक केली. त्यामुळे लाखो शेतकरी नुकसानीचा दावा दाखल करु शकले नाहीत. विशेष म्हणजे कृषी विभागाने सुध्दा जिल्ह्यातील साडे चार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत पिकविमा नुकसान भरपाई न मिळाल्यास पिकविमा कंपनीला घेराव घालण्याचा इशारा खासदार गवळी यांनी दिला आहे.