महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळ : डम्पिंग ग्राउंडसाठी शिवसेना-भाजप नगरसेवक आमनेसामने

By

Published : Aug 16, 2019, 10:05 AM IST

Updated : Aug 16, 2019, 10:15 AM IST

यवतमाळ शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याची परिस्थिती नगरपालिकेवर ओढवली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डम्पिंग ग्राऊंडसाठी शिवसेना-भाजप नगरसेवक आमनेसामने आले आहेत.

यवतमाळ - महामार्गावरील बार, वाइनशॉप यवतमाळ नगरपालिकेच्या हद्दीत यावी, यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक एकत्र येतात. मात्र, हेच नगरसेवक शहरातील कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने एकत्र का येत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक चंदू चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक गजानन इंगळे यांनी केला आहे. तसेच शहरातील कचरा टाकण्यासाठी जोपर्यंत कायमस्वरूपी जागा मिळणार नाही, तोपर्यंत पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरूच राहण्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे.

डम्पिंग ग्राऊंडसाठी शिवसेना-भाजप नगरसेवक आमनेसामने आले आहेत.

यवतमाळ नगरपालिकेमध्ये भाजपचे 29 नगरसेवक, काँग्रेसचे 12, शिवसेनेचे 8, बसपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, प्रहारचा एक असे 56 नगरसेवक पालिकेत आहेत. मात्र, भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असून सुद्धा डम्पिंग ग्राउंड प्रकरणी नगरसेवक उदासिन दिसत आहे. एकीकडे 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' असे फलक यवतमाळात लावण्यात आले आहेत, तर दुसरीकडे कचरा टाकण्यासाठी जागाच नाही, अशी परिस्थिती नगरपालिकेवर ओढवली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेकडून विना परवानगी औद्योगिक वसाहत परिसरात कचरा टाकणे सुरू केले आहे. त्याठिकाणी केवळ पंधरा दिवसाचे कचरा संकलन होणार आहे. त्यामुळे पुन्हा हा प्रश्न पेटणार असल्याने शिवसेना नगरसेवकांचे म्हणणे आहे. तसेच याला एमआयडीसी तसेच एमआयडीसी औद्योगिक संघटनेने विरोध केल्याने पुन्हा एकदा कचरा टाकण्याचा मुद्दा चिघळणार आहे. कचरा संकलन करण्यासाठी जागा नसल्याने पालिका शहराच्या चार बाजूने कचरा टाकत आहे. जागेअभावी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कचरा प्रश्न पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवकांनी कचराप्रश्नावरुन आंदोलन केले होते. मुख्याधिकाऱयांनी आश्वासन दिल्यानंतर कचरा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा कचरा कोंडी होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन छेडले आहे. पालिकेच्या वाहनतळात शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. शिवसेना गटनेते गजानन इंगोले, उद्धवराव साबळे, पंकज देशमुख, वैशाली कनाके, नीलेश बेलोकार, रवी राऊत, पिंटू बांगर यांनी आंदोलन सुरू केले आहे.

यवतमाळ शहराची लोकसंख्या ही चार लाखाच्या घरात आहेत. शहरातील कचरा उचलण्यासाठी 62 वाहने नुकतीच पालिकेने खरेदी केली आहे. मात्र, नगरपालिकेत विरोधाला विरोध करीत डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा बनत आहे. याकडे पालकमंत्री मदन येरावर हे सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. जागा मिळाली नाही तर सर्वजण राजीनामे देणार, असे पत्रही पाठविण्यात आल्याचे यावेळी शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सांगितले.

Last Updated : Aug 16, 2019, 10:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details