यवतमाळ -जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. तसेच शेतकरीविरोधी कृषी कायदा मागे घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यवतमाळमध्ये शेतकरी-वारकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा - yawatmal shekari warkari organisation latest news
विविध मागण्यांसाठी यवतमाळात शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने बैलबंडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी आग्रही भूमिका यावेळी घेण्यात आली. संघटनेच्यावतीने संबंधित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना देण्यात आले.
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. असे असतानाही नजरअंदाज आणेवारी ही 65 टक्के काढण्यात आली. त्यामुळे तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात यावे. तसेच नजरअंदाज आणेवारी तातडीने बदलण्यात यावी, या मागण्यांबरोबरच केंद्र सरकाने शेतकरीविरोधी कायदा मंजूर केला आहे. हा कायदाही रद्द करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी हा कमी शिकलेले असल्याने त्यांना हा कायदा चांगला असल्याचे सांगून त्यांची फसगत करण्यात येत आहे. पीक काढण्याचे दिवस असताना शेतकऱ्यांना हे आंदोलन करावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने या मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे देण्यात आले.