महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांदा निर्यातबंदी: खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेकडून ‘राख रांगोळी’ आंदोलन - onion export ban issue in Maharashtra

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केलेल्या निर्णयाचे पडसाद यवतमाळ जिल्ह्यात उमटले आहेत. शेतकरी संघटनेने खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर आंदोलन करत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

शेतकरी संघटनेचे आंदोलन
शेतकरी संघटनेचे आंदोलन

By

Published : Sep 23, 2020, 10:54 PM IST

यवतमाळ- देशात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचा निषेध करत शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राख, रांगोळी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून सरकारला निर्यातबंदी आदेश मागे घेण्यास भाग पाडावे, याकरिता हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने कांदा सहा महिने विकला. आत्ता कुठे किमान खर्च भरून निघेल, असे भाव मिळू लागले. तर केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा शेतकरी संघटेनेने आरोप केला.

शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या नव्हे तर देशाचे आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातबंदी करून सरकारने शेतकऱ्याच्या प्रपंचाची राखरांगोळी केली आहे.

शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतु शेतकऱ्यांनी निवडून दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले.

कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी होत असल्याची कल्पना देण्यासाठी यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर केंद्र सरकारने काढलेल्या कांदा निर्यातबंदी आदेशाची प्रती जाळण्यात आल्या आहेत.

यावेळी खासदार गवळी यांचे स्विय सचिव नितीन बांगर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय निवल, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटींग, जयंतराव बापट, प्रज्ञा बापट, इदरचंद बैद, नानाजी खादंवे, कृष्णराव भोंगाडे, भास्करराव महाजन, हिम्मतराव देशमुख व चंद्रशेखर देशमुख यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details