यवतमाळ - ‘चूल आणि मूल’ या पांरपरिक संकल्पनेतून महिला कधीच्याच बाहेर पडल्या आहेत. आज कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात महिलांचा वाटा आहे. दैनंदिन व्यवहारातील जमाखर्च, मुलांचे शिक्षण, घर आदी जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळत आहेत. एकप्रकारे महिला ह्या उत्कृष्ट व्यवस्थापकाची भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
‘एसबीआय चावडी’ या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने पोस्टल ग्राऊंड येथे भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीआयचे उपमहाप्रबंधक रजत बॅनर्जी, अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन, क्षेत्रीय व्यवस्थापक सुहास ढोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री; यवतमाळामध्ये शिवसैनिकांचा जल्लोष
बँकेच्या वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांना कळाव्यात, या उद्देशाने भारतीय स्टेट बँकेच्यावतीने २ दिवसीय चावडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांनी महिला बचत गटांना जास्तीत जास्त मदत करावी. बँकेतून घेतलेल्या कर्जाची महिला वेळेपूर्वीच परतफेड करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पैशाच्या नियोजनाबाबतीत त्या उत्कृष्ट व्यवस्थापक असून महिलांमुळे गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचा विकास होण्यास मदत होते. महिला बचत गटाची चळवळ आणखी जोमाने चालविण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने बचत गटांना सहकार्य व आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. या चावडी उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ व ग्राहक मिळावे, हा सुध्दा उद्देश आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या महिलांना कर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रदर्शनात एकूण 45 स्टॉल लावण्यात आले होते, ज्यापैकी 32 स्टॉल हे महिला बचत गटांचे होते.
हेही वाचा -राज्यपालांच्या हस्ते बिटरगावचा सन्मान; घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरस्कार