यवतमाळ- जलसंपदा विभागाच्या वतीने १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. त्याच्या आधीच्या आठवड्यात शहर व ग्रामीण भागामध्ये पाणी वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जलजागृती सप्ताह कार्यक्रम पाण्याचा काटकसरीने वापर करणे म्हणजेच पाणी निर्माण करणे होय, असे मार्गदर्शन जल जागृती सप्ताहानिमित्त अधीक्षक अभियंता राजेंद्र कापल्लीवार यांनी केले. जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलद शर्मा, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. प्रमोद यादगिरवार, प्राचार्य अविनाश शिर्के उपस्थित होते.
गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात अपुऱ्या पाण्यामुळे दुष्काळाला समोर जावे लागले होते. त्यामुळे पाण्याची किंमत यवतमाळकरांना नक्कीच झाली होती. हीच परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना केले. या सप्ताहानिमित्त रविवारी पोस्टल ग्राउंड पासून सकाळी साडेसात वाजता जलद दौडचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च रोजी बाबुळगाव, दिग्रस, पांढरकवडा येथील प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात कार्यशाळा, चर्चासत्र घेण्यात येणार आहे. १९ मार्चला कळंब, राळेगाव, दारव्हा, वणी, नेर, घाटंजी तालुक्यातील प्रकल्पावरील पाणी वापर संस्था पदाधिकारी व लाभधारकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
२० मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारच्या कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहेत. या सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनजागृती सप्ताहाच्या दिंडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.