यवतमाळ- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशिक्षित चालक प्रमाणपत्र विक्रीचा गोरख धंदा चव्हाट्यावर आला आहे. या ठिकाणी ३ ते ४ हजार रुपयात प्रमाणपत्र विकले जात आहे. प्रामुख्याने आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रमाणपत्रे विकल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार परिवहन विभागातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यवतमाळमध्ये एसटी चालक प्रमाणपत्रांची खुलेआम विक्री, व्हिडिओ व्हायरल त्यामुळे आता या संबंधीत कर्मचाऱ्यावर वरिष्ठ काय कारवाई करणार का? संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकरणात हात गुंतले आहेत का ? अशी चर्चा राज्य परिवहन विभागात सुरू आहे.
पांढरकवडा येथील आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रात आदिवासी समाजातील उमेदवारांना चालकाचे प्रशिक्षण दिले जाते. एका वेळी किमान ५० उमेदवारांना चालकाचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांची चाचणी घेतली जाते. यंत्र अभियंता, विभागीय वाहतूक अधिकारी, वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) या तिघांची समिती या उमेदवारांची चाचणी घेऊन प्रमाणपत्र बहाल करते. यासाठी घाट, गर्दीचा रस्ता, नागमोडी वळण तसेच इतरही भागातून चालकांची चाचणी घेतली जाते. अनुत्तरित झाल्यास पुन्हा प्रशिक्षण कालावधी वाढविला जातो. तर या ठिकाणी प्रशिक्षण न घेतलेल्या उमेदवाराला पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणामुळे परिपूर्ण नसलेले चालक स्टेअरिंग सांभाळणार असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारामुळे राज्य परिवहन विभागातील या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.