यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघ गेल्या एक दशकापासून शिवसेनेचा गड समजला जातो. शिवसेनेकडून यावेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट सामना होणार आहे. या दोघांसमोर पक्षांतील अंतर्गत गटबाजी संपवण्याचे मोठे आव्हान आहे.
भावना गवळी यांनी १९९९ ते २००९ वाशिम मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर २००९ साली झालेल्या पुनर्रचनेत यवतमाळ - वाशिम हा एक लोकसभा मतदार संघ तयार करण्यात आला. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस-दारव्हा, राळेगाव, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर-वाशिम आणि कारंजा-मानोरा, असे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात ४ भाजप, १ राष्ट्रवादी व १ शिवसेनेच्या ताब्यात आहे.
मतदारसंघात कुणबी, मराठा, बंजारा, आदिवासी, बौद्ध, मुस्लीम, माळी आणि तेली या समाजाचेही मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. येथील निवडणूक ही यावेळी घाटोळे-पाटील विरुद्ध खैरे-पाटील, अशी होणार आहे. खासदार भावना गवळी या मराठा असल्या तरी त्या घाटोळे -पाटील आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे तिरळे कुणबी असून या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. घाटोळे पाटील समाजाचे मतदान हे ५० हजारांवर असल्याने गवळी यांच्यासाठी जातनिहाय समीकरणाचा विचार केल्यास ही निवडणूक जिंकणे फार कठीण आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बंजारा समाजाचे प्रा. प्रवीण पवार, प्रहारच्या वैशाली येडे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार पी. बी. आडे हे तिघेही रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे.
सद्याची राजकीय परिस्थिती -
लोकसभा मतदार संघात राळेगाव, यवतमाळ, वाशिम आणि कारंजा या ४ विधानसभा मतदारसंघात भाजप तर दिग्रसमध्ये एक सेनेचा आमदार असला तरी या निवडणुकीत ते सेनेच्या उमेदवारासाठी मते मिळवून देण्यास कठीण जाणार आहे. शिवाय, सेनेत अंतर्गत गतबाजी असून ती दूर करणे अद्यापही जमलेले दिसत नाही. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, सिंचनाचा प्रश्न हा कळीचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे या शेतकरी विधवा असल्याने त्या काँग्रेस व सेना या दोन्ही उमेदवारांचे गणित बिघडवू शकतात.
२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारास यवतमाळ, दिग्रस, राळेगाव आणि कारंजा ४ विधानसभा मतदारसंघातून चांगली बढत मिळाली होती. तर काँग्रेसच्या उमेदवाराला वाशिम आणि पुसद या २ विधानसभा मतदारसंघात बढत मिळाली होती. यावेळीही असेच राहिल्यास काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. कारण मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही विद्यमान आमदार नाही.
तर या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांच्यावर मतदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे. ४ मतदारसंघ भाजपचे असले तरी त्या ठिकाणी शिवसेनेला सहकार्य होईल, असे चित्र सध्या तरी दिसून येत नाही. शिवसेनेतील गटबाजी आणि बंजारा व पाटील समाजाचे उमेदवार असल्याने मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्याचा कशा प्रकारे फायदा घेतो पाहणे उचित ठरणार आहे.
सेनेत दोन गट