यवतामाळ - जिल्ह्याच्या दिग्रस व आर्णि मतदारसंघात भाजपचे संजय देशमुख आणि आर्णि मतदार संघात आमदार राजू तोडसाम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले आहे. दिग्रस ही जागा युतीमध्ये शिवसेनाकडे तर आर्णी मध्ये भाजपने उमेदवार बदलला आहे.
दिग्रस आणि आर्णीत भाजपची बंडखोरी यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार महसूलराज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपा नेते माजी मंत्री संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देशमुखांच्या बंडखोरीमुळे संजय राठोड यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. २०१४च्या निवडणुकीत राज्यात सत्तांतर होताच माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर दिग्रस विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली. मात्र, आता भाजप सेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने संजय देशमुख यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने संजय राठोड यांची डोकेदुखी वाढली आहे.
यवतमाळच्या आर्णी मतदारसंघात भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात भाजपाने माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. राजू तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने स्थानिक भाजप नेतृत्वाणे देखील उमेदवार बदलण्याची मागणी केली असल्यामुळे तोडसाम यांचा पत्ता कट करून धुर्वेंना भाजप ने संधी दिली. मात्र, नाराज राजू तोडसाम यांनी धुर्वें विरोधात बंड करीत उमेदवारी दाखल केली. तोडसाम आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवतात की पक्ष नेतृत्व त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते याकडे लक्ष लागले आहे.
आर्णी येथील भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांची उमेदवारी भाजपाने नाकारून त्यांचे जागी डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे तोडसाम अस्वस्थ झाले. अखेर त्यांनी आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपशी बंडखोरी करत आपले नामांकन दाखल केले. एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस व आर्णी या विधानसभा मतदार संघात भाजप नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष नामांकन दाखल केले. बंडखोरांमुळे येत्या विधानसभा निवडणुकीतील समीकरण बदलण्याची शकयेता निर्माण झाली आहे. बंडखोरांची मनधरणी करण्यात कोण यशस्वी भूमिका निभावणार या कडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.