यवतमाळ -संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांची उद्या आझाद मैदानावर दुपारी सभा होणार आहे. मात्र या सभेला दोन वेळा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र 'हल चलाने वाला, हात नही जोडेगा' हा अजेंडा घेत राकेश टिकैत यांची सभा कोणत्याही परिस्थितीमध्ये होणारच असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या सभेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच आझाद मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान आता ही सभा होणार की नाही, हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
'राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगीची गरज नाही'
संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांची उद्या यवतमाळमधील आझाद मैदानावर दुपारी सभा होणार आहे. मात्र या सभेला दोन वेळा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र 'हल चलाने वाला, हात नही जोडेगा' हा अजेंडा घेत राकेश टिकैत यांची सभा कोणत्याही परिस्थितीमध्ये होणारच असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे यांनी दिली आहे.
राज्यभरातून शेतकरी राहणार सभेला उपस्थित
सरकारने नवे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली येथे मोठ्या संख्येने महापंचायती होत आहेत. कुठेच परवानगी घेतली नाही, त्यामुळे उद्या देखील परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हा देश शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांना परवानगीची गरज नाही. ही सभा उद्या ठरलेल्या वेळेप्रमाणे होईल. या सभेला कोल्हापूर, पंढरपूर, पुणे , जळगाव यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती संदीप गिड्डे यांनी दिली आहे.