यवतमाळ - पुसद पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी माहुर फाटा परिसरात छापा टाकला. या छाप्यात एकाजवळून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. शुभम मनोज जयस्वाल असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान शुभमची चौकशी केली असता, त्याने आपला चुलतभाऊ अमोल दिपक जयस्वाल आणि तो असे दोघे मिळून शिरपूरमध्ये बनावट दारू तयार करत असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी या बनावट कारखान्यावर धाड टाकून 14 लाख 25 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी बनावट दारू तयार करून ती यवतमाळ जिल्ह्यात विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
बनावट दारू कारखान्यावर छापा आरोपींविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान पोलिसांनी बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकून, घटनास्थळावरून विविध दारू कंपन्यांची बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. त्यामध्ये स्पिरीट, कलर प्लॅस्टीकची बॉटल, ड्रममधून स्पिरीट काढण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन, दारूच्या विविध कंपन्यांचे लेबल, बनावट दारूचा साठा, एक दुचाकी व एक चार चाकी असा एकूण 14 लाख 25 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -बनावट आधार कार्डवर महागड्या ट्रायडेंटमध्ये राहात होते वाझे, एनआयएचा गौप्यस्फोट