यवतमाळ - आठवडाभरापासून दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. दररोज पंधरा-वीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. सकाळी दहा ते दुपारी दोन याच कालावधीत बाजारपेठा, व्यापारी संकुल, प्रतिष्ठाने सुरू राहणार. यानंतर मात्र पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
यवतमाळमध्ये दुपारनंतर पोलिसांची धडक कारवाई; प्रत्येक चौकात तपासणी - yavatmal latest news
यवतमाळमध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांचा विचार करता दुपारनंतर संचारबंदी लावण्यात येत आहे. या कालावधित विनाकारण फिरणाऱ्या, मास्क न लावणाऱ्या तसेच दुचाकीवर डबलसीट व चारचाकीमध्ये तीनपेक्षा जास्त लोक दिसल्यास त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
नुकतीच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. दुपारी दोननंतर संपूर्ण वेळात संचारबंदी सदृश्य स्थिती ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे दुपारी दोन नंतर चौका-चौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून मास्क न वापरणे, दुचाकीवर डबलसीट जाणे, चारचाकी वाहनात तीन पेक्षा अधिक नागरिक असणे या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.