वणीतील लालपुलिया परिसरातील कोलडेपोवर छापा; ३ ट्रक जप्त - यवतमाळ वेकोलि कोळसा खाण कंपनी
लघु उद्योग करणारे व्यावसायिक हजारो टन कोळशाची खरेदी 'वेकोलि' (वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड) कडून करतात. मात्र, अल्प दरातील कोळसा उद्योगात न वापरता त्याची खुल्या बाजारात विक्री केली जाते. अशा प्रकारे शासनाची फसगत करून वेकोलिला लाखो रुपयाने चुना लावला जात आहे.
यवतमाळ - जिल्ह्यात ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या वणी येथे कोलडेपोमध्ये गैरव्यवहार झाला आहे. येथील अनुदानित कोळसा विक्रीत हेराफेरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी लालपुलिया परिसरातील कोलडेपोवर छापा मारून धडक कारवाई केली. या कारवाईत तीन ट्रक आणि कोळसा जप्त करण्यात आला आहे.
अल्प दरातील कोळसा खुल्या बाजारात-
देशात लघु उद्योगाला चालना मिळावी याकरिता शासन स्तरावरून अल्प दरात कोळसा पुरविला जातो. लघु उद्योग करणारे व्यावसायिक हजारो टन कोळशाची खरेदी 'वेकोलि' (वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड) कडून करतात. मात्र, अल्प दरातील कोळसा उद्योगात न वापरता त्याची खुल्या बाजारात विक्री केली जाते. अशा प्रकारे शासनाची फसगत करून वेकोलिला लाखो रुपयाने चुना लावला जात आहे.
35 लाखांचा मुद्देमाल जप्त
वणी पोलिसांच्या छाप्यानंतर पुढे आलेल्या माहितीत, नागपूर येथील प्राईड मेटल इंडस्ट्रीजला निलजई कोळसा खाणीतून अल्प दरात कोळसा वितरित करण्यात आला होता. वेकोलितून प्रत्येकी 24 टन कोळसा भरलेले 3 ट्रक नागपूरला जाण्याकरता निघाले होते. मात्र, हे वाहन नागपूर येथे न जाता वणी लगत असलेल्या लाल पुलिया परिसरातील 3 कोल डेपोवर कोळसा खाली करीत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. त्यांनी छापा मारून कोळसा डेपोवर खाली होणाऱ्या 3 वाहनांसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने कोळसा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.