यवतमाळ - मारेगाव तालुक्यात कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केले आहे. यावर्षी बीटी बियाणे वापरूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शेतीच्या खर्चासह फवारणीचाही खर्च वाढला आहे. सध्या गुलाबी बोंड अळीमुळे मनोहर जुनघरी यांनी आपल्या शेतातील ४ एकर कपाशी रागाच्या भरात काढून टाकली आहे. शेतीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेतीसाठी कुठे-कुठे पैसा खर्च करायचा? हा प्रश्न भेडसावत असताना लाल बोंड अळीचे संकट हे कपाशीच्या पिकाला मातीत घालणारे आहे.
बोंडे परिपक्व झाल्यानंतर अळी बोंडे पोखरत असल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगाम निघून गेला असल्यामुळे गहू व हरभऱ्याची लागवड आता करता येत नाही. त्यामुळे खरिपातील कपाशीचे नगदी पीक संपूर्ण वाया गेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.