यवतमाळ - जिल्ह्यातीळ बाभूळगाव तालुक्यातील राणीअमरावती येथील दिलेश परडखे या शेतकऱ्याने ट्रॅक्टर भंगारातील साहित्यापासून घरीच तयार फवारणी यंत्र लावून शेतात फवारणी सुरू केली आहे. ते यंत्र त्यांनी स्वतः तयार केले आहे. या जुगाड तंत्रज्ञानामुळे फवारणी करताना कुठलीही विषबाधा फवारणी करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. शिवाय एका दिवसात तब्बल 35 एकर क्षेत्रात फवारणी होत असल्याने चार हजार रुपयांची दिवसाला बचत होत आहे. या यंत्रांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
कर्नाटकातून मागवली रबरी चाके -
परखडे हे दोन वर्षापूर्वी कर्नाटक मधील नारकंडा जिल्ह्यातील हुबळी येथे गेले होते. त्यावेळी ट्रॅक्टरला बारीक चार इंच रुंदीचे चाके लावल्याची त्यांना दिसून आले. मागील दोन वर्षापासून त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता, आपल्याकडील छोट्या ट्रॅक्टरला अशीच चाके लावल्यास त्याचा उपयोग शेतीमध्ये करता येईल. त्यामुळे त्यांनी हुबळी येथून ट्रॅक्टरला त्यांनी समोर 3 फूट आणि मागील चाक 4 फूट उंचीची मोठी रबरी चाके लावली. यासाठी त्यांना 84 हजार रुपये या चार चाकांसाठी मोजावे लागले. यातून त्यामुळे सोयाबीनसारख्या दाट पिकांत सुद्धा योग्य पध्दतीने आणि योग्य दाबाने फवारणी होते. एकसारखी फवारणी झाल्याने पिकांवरील अळी नष्ट करण्यासाठी या फवारणीचा योग्य परिणाम देखील जाणवत आहे.
डवरणी सुद्धा योग्य पद्धतीने -
या ट्रॅक्टरद्वारे पिकांची डवरणी सुध्दा करता येते. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनसुध्दा मिळतो आणि असे करताना पिकांचे नुकसान होत नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीस याचा लाभ होतो. तसेच कपाशी व इतर पिकात या ट्रॅक्टरद्वारे योग्य प्रकारे डवरणी करता येते.