यवतमाळ- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील नागरिक इतर ठिकाणी तर इतर ठिकाणचे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात आहेत. त्यांच्या मदतीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर नागरिक मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 लोकांची चमू यासाठी कार्यरत असून सरासरी दिवसाला 300 कॉल या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
यवतमाळमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर नागरिक मदत कक्ष... हेही वाचा-धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
31 मार्चपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांची संख्या 574 आहे. या नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून इंग्रजी भाषेतून मजकूर तयार करुन राज्य समन्वय ग्रुपमध्ये शेअर केला जात आहे. या ग्रुपकडून सदर माहिती त्या-त्या राज्यांना वितरीत करण्यात येत आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील नागरिकांना त्या-त्या संबंधित राज्यात तेथील प्रशासनाकडून मदत मिळू शकणार आहे. इतर जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 922 नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनाला दररोज माहिती देण्यात येत आहे. यात नागरिकांचे मोबाईल क्रमांकसुध्दा देण्यात येत आहेत. या नागरिकांना त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडून मदत देण्याबाबत सुचित करण्यात येत आहेत.
इतर राज्यातील व जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची संख्या 2 हजार 353 आहे. यापैकी 1 हजार 903 नागरिकांची राहण्याची त्यांची स्वत:ची व्यवस्था असल्यामुळे उर्वरित 450 नागरिकांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तर सर्व 2 हजार 353 नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांना स्वत:ची माहिती यंत्रणेस सांगण्याकरिता राष्ट्रीय सूचना व माहिती केंद्राच्या (एनआयसी) माध्यमातून मॅसेज पाठविण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत एकूण 4 हजार 527 नागरिकांना 12 हजार 335 मेसेज पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी दिली.