यवतमाळ - स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाच्या पोत्यात चक्क मातेरा असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या प्रकारामुळे ग्राहक संतापले असून चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केलीय. तर काही ठिकाणी चक्क स्वस्त धान्य दुकानदारावरच ग्राहकांकडून आगपाखड करण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणा-या गव्हाच्या पोत्यात चक्क मातेरा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात नागरिकांची अडचण टाळण्यासाठी योग्य प्रमाणात धान्य वाटप करण्याचा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला एप्रिल ते जून असे तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, शासनाने फक्त एप्रिल महिन्याचेच धान्य उपलब्ध करून केले आहे. यामध्ये साधारण एक लाख ३२ हजार क्विंटल धान्य उपलब्ध झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील मालाचे लॉकडाऊन संपण्यापूर्वी वाटप करावे, अशा सुचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र आता या धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती मिश्रीत गहू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे ग्राहक संतापले असून, हा संताप रेशन धान्य दुकानदारावर काढण्यात येतोय. त्यातच शासनाने तीन महिन्यांचे धान्य देण्याचे सांगून केवळ एकाच महिन्याचे धान्य वाटप केल्यामुळेही नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी टप्प्या-टप्प्याने धान्य उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. तसेच गव्हामधील माते-याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगितले. अशा स्वरुपाची तक्रार प्राप्त झाल्यास पुढील पावले उचलण्यात येईल, असेही भराडी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील २१ लाख नागरिकांना पाच किलोप्रमाणे मोफत तांदुळ वाटप करण्यात येणार आहे. गोंदियातून जिल्ह्याला २० हजार क्विंटल तांदुळ आला असून १० एप्रिलला जिल्ह्यातील तहसीलकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर काही तालुक्यात आज वाटपसुद्घा करण्यात आल्याची माहिती आहे. यवतमाळ शहरात तेराशे क्विंटल तांदुळ वाटप करण्यात आल्याची माहिती पुरवठा अधिका-यांनी दिलीय. तसेच धान्य खराब असल्याबाबच्या तक्रारी आल्यास कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.