यवतमाळ -दिवाळी हा दिव्यांचा सण. दिवाळीत विविध रंगात रंगवलेले दिवे, पणत्या पाहायला मिळतात. दिवाळीसाठी मातीचे दिवे बनवण्यासाठी कुंभार राबतात. मात्र, प्लास्टिकच्या दिव्यामुळे कारागिरांची दिवाळी अंधारात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असल्याने उधार-उसनवारी करून विकतची माती आणून कुंभार समाज बांधवांनी दिव्यांची निर्मिती केली. दिवे विक्रीतून दोन पैसे आपल्या हातात पडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, विक्रेत्यांना अजूनही ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागत आहे.
दिव्यांना मागणी नसल्याने कारागिरांची दिवाळी अंधारात रेडिमेट दिव्यामुळे व्यवसायावर गंडांतर -
मातीपासून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती कुंभार समाज बांधव करतात. दिवाळीला दिवे बनवून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. या दिव्याची खरेदी ग्राहक करतात. मात्र, आता मशीनमधू दिव्याची निर्मिती केली जाते. ग्राहकांचा कल हा कलाकुसरीने केलेल्या दिव्याकडे असल्याने कोलकाता, गुजरात येथील तयार केलेले दिवेही विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे स्वतः तयार केलेल्या दिव्यांना ग्राहकांची मागणी अल्प असते. त्यामुळे एक प्रकारे हाताने तयार केलेल्या दिव्यांना मागणी नसल्याने या व्यवसायावर गंडांतर येत आहे.
कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प -
मागील नऊ महिन्यापासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. उन्हाळ्यात त्याचा परिणाम कुंभार व्यावसायिकांवर झाला. माठ विक्री झाले नाही. त्यानंतर आलेल्या सनातून म्हणावी तशी विक्री झाली नाही. आता सर्व मदार दिवाळी सणावर आहे. परंतु, ग्राहक दिवे व मातीचे साहित्य खरेदी करण्यासाठी येत नाही. त्यामुळे मालावर केलेला लाखो रुपयांचा खर्च निघणेही कठीण झाले आहे.
हाताने तयार केलेल्या दिव्यांना मागणी नाही