महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुसद विधानसभा मतदारसंघ : नाईक घराण्यातील नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार का? - पुसद विधानसभा मतदारसंघ

पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचा मोठा प्रभाव आहे. बंजारा समाजासोबत दलित, ओबीसी वर्ग, मुस्लीम समाज आणि काही प्रमाणात आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी आहे. विरोधकांनी कितीही जोर लावला तरी येथे मनोहरराव नाईक यांनीच प्रत्येक वेळी बाजी मारली आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघ

By

Published : Sep 20, 2019, 3:58 PM IST

यवतमाळ - पुसद विधानसभा मतदारसंघ हा नाईक घराण्याचा बालेकिल्ला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक तीनवेळा, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक पाचवेळा, तर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मनोहर नाईक पाचवेळा या मतदारसंघातून विजयी झाले. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत नाईक घराण्यातील उमेदवारच येथून विजयी झाला आहे. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार मनोहर नाईक आहेत. मात्र , वयोमर्यादेचे भान ठेवत आगामी विधानसभा निवडणूक ते लढणार नाहीत. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती नाईक व कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक दोघेही नाईक घराण्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहेत.

पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचा मोठा प्रभाव आहे. बंजारा समाजासोबत दलित, ओबीसी वर्ग, मुस्लीम समाज आणि काही प्रमाणात आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी आहे. विरोधकांनी कितीही जोर लावला तरी येथे मनोहरराव नाईक यांनीच प्रत्येक वेळी बाजी मारली आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघ

हेही वाचा - अशोकराव आता तुमचं काय ठरलयं?

हा मतदारसंघ बंजाराबहुल असून दुसऱ्या क्रमांकावर आदिवासी आंध समाज यांची सर्वाधिक मते आहेत. शिवाय हटकर, धनगर, तेली, माळी, कुणबी असा बहुजन समाज आहेत. बंजारा तसेच ओबीसी समाज हा नाईक घराण्याला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. तर आदिवासी समाजाची परंपरागत मते शिवसेनेकडे वाढताना दिसते. बंजारा, मुस्लीम, दलित आणि बहुजन समाजाच्या पाठिंब्याने मतदारसंघात नाईक घराण्याचे कायम वर्चस्व राहिले आहे.

हेही वाचा - युतीचा फॉर्म्यूला आधीच ठरलाय.. 135-135 जागांच्या मागणीवर अजूनही ठाम - उद्धव ठाकरे

2009 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मनोहरराव नाईक यांचे पुतणे अॅड.निलय नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. ते सध्या भाजपमध्ये आल्याने या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून आमदार निलय नाईक यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, ही जागा युतीतील शिवसेनेकडे असल्याने भाजपला मिळणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवल्याने या मतदारसंघावर शिवसेनेने आपला हक्क प्रस्थापित केला आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाचा सोबतच आदिवासी मतांचे मोठे प्राबल्य असल्याने आणि आदिवासी मतांचा कल हा शिवसेनेकडे असल्याने आदिवासी उमेदवार देण्यासाठी शिवसेनेचा सध्या शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा - आष्टी; राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यातच, मुलाच्या उमेदवारीसाठी धस कापणार का आमदार धोंडेंचे तिकीट?

या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुपाटे यांचे नाव समोर येत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे ते प्रथमत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना पुसद विधानसभा मतदारसंघातून सहा हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर पुसदमध्ये शिवसेना नेहमीच पराभूत होत असल्याने आता भाजपला या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी यासाठी अॅड. निलय नाईक जोर लावत आहेत.

विदर्भातील एकमेव आमदार असलेले मनोहरराव नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे इंद्रनील नाईक हे एकदम प्रकाशझोतात आले होते. मनोहरराव नाईक यांनी सहविचार सभेनंतर व्होटबँकचा कानोसा घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
मनोहरराव नाईक यांचे वाढते वय बघता ज्येष्ठ चिरंजीव ययाती नाईक व कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यापैकी एकाच्या नावावर या पुसद विधानसभा मतदारसंघात उमेदवारिवर मोहोर लावतील असे दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना यांची युती झाल्यास मनोहरराव नाईक यांना राष्ट्रवादीचा गड कायम राखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन कर्तबगार मुख्यमंत्री या मतदारसंघातून लाभले आहे. इतकेच नाही तर आतापर्यंत सतत या मतदारसंघाला मंत्रीपदही लाभले आहे. मात्र, त्यामानाने या मतदारसंघात आरोग्य सेवा, वाहतूक रस्ते, उद्योगधंदे, पिण्याचे पाणी अशा पायाभूत सुविधांचा अभाव आजही कायम दिसून येत आहे. माळपठार क्षेत्रात असलेल्या या मतदारसंघाच्या एका बाजूला पूसनदीवरील वसंतसागर व दुसऱ्या बाजूला पैनगंगा नदीवरील ईसापुर धरण अशा दोन मोठ्या जलाशयाचे पाणी डोळ्याने दिसत असूनही माळपठार सतत तहानलेलाच असतो.

मागील कित्येक वर्षापासून पुसद जिल्ह्याची मागणी अधांतरीच असून पुसद जिल्ह्याच्या ठिकाणाचे सर्व निकष पूर्ण करीत आहेत. मात्र, जिल्हा नवनिर्मितीचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. जिल्ह्याची निर्मिती झाल्यास पुसदचा विकासाला चालना निश्चित मिळू शकेल.

मात्र पुसद विधानसभा मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा मनोहरराव नाईक आणि अॅड. निलंय नाईक विरोधक असे दोन प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळतात.
कुठल्याही पक्षाचा उमेदवार निवडून आल्यास तो नाईक घराण्यातीलच असणार हे मात्र निश्‍चित.

2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनोहरराव नाईक यांना 94 हजार 152 मध्ये मिळाली होती. तर शिवसेनेकडून प्रकाश देवसरकर यांना 28 हजार 793 मते मिळाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक हे 65 हजार 359 मतांनी विजयी झाले होते. भाजपचे उमेदवार वसंतराव कान्हेकर यांना 15017 मते मिळाली, तर काँग्रेसचे सचिन नाईक यांना 15017 मते मिळाली होती.

पुसद मतदारसंघांमध्ये एक लाख 54 हजार 334 पुरुष मतदार तर एक लाख 38 हजार 824 महिला मतदार असे एकूण दोन लाख 93 हजार 158 मतदार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details