यवतमाळ - एक लाखांच्या बदल्यात तीन लाखांचे आमिष दाखवत लूटमार केल्या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. राजू बुजाडे, अरविंद चौगुले, लीलाधर मूरस्कर, अविनाश जांभुळकर, मारोती पवार (सर्व रा. मारेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. फिर्यादी महेंद्र ईश्वरलाल तिवारी (39 रा. भद्रावती) यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र ईश्वरलाल तिवारी यांना तीन आठवड्यापूर्वी आरोपी राजू बुजाडे यांनी, मला तुम्ही एक लाख रुपये द्या. मी तुम्हाला तीन लाख रुपये देतो, असे आमिष दाखवले होते. त्यानुसार फिर्यादी हे कर्जबाजारी असल्याने कर्ज फिटेल या आशेने तीन लाखाच्या प्रलोभनाला भुलून पैसे द्यायला तयार झाले. दि. 11 जुलै रोजी 11 वाजता आरोपी राजु बुजाडे यांनी फिर्यादीला फोन करून अरविंद चौगुले नामक माझा माणूस दुचाकीने भद्रावती येथे आला आहे. त्यांच्या सोबत तुम्ही एक लाख रुपये घेऊन वणीला या, असे सांगितल्यावरून फिर्यादीने सोबत मामेभाऊ मनोज मुरलीधर शर्मा (रा. चंद्रपूर) याला घेऊन दुचाकीने भद्रावती येथे आले. तिथे अरविंद चौगुले सोबत वणी येथे गेले. येथून त्यांना मारेगाव येण्यास सांगितले. रात्री साडेआठ वाजता दरम्यान अरविंद चौगुलेसोबत अविनाश जांभुळकर, लीलाधर मुरस्कार, मारोती पवार हे व्यक्ती आल्याने फिर्यादीने अरविंद चौगुले याला हे लोक कोण आहे, असे विचारणा केली असता. हे सर्व आमचे सहकारी आहे, घाबरायचे कारण नाही, असे सांगितले.