यवतमाळ : आपण अडीच वर्ष घरात बसून राज्य चालवून दाखवले, जनतेचा आशीर्वाद मिळवला. मात्र तुम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात अपयश आले. भाजप देशात एक देश एक कायदा आणत आहे. भाजपच्या या एक देश एक कायदा संकल्पना आम्हाला मान्य आहे. मात्र एक देश एक पक्ष ही भाजपची संकल्पना आम्हाला मान्य नसल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सभेत केला.
भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांची भरती : भाजप हा बाजार करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी मेहनत करून भाजप वाढवला. पण, आता बाजरबुणगे येत आहे. भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची भाजपमध्ये भरती केली जात आहे. त्यांच्या सतरंज्या उचलन्याचे काम भाजपाचे निष्ठावंत अंधभक्त करत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मणिपूरची परिस्थिती बिकट :उद्धव ठाकरे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये जाऊन प्रचार करतात. मात्र त्यांना मणिपूरमध्ये जाण्यास वेळ नाही. मणिपूरची परिस्थिती बिकट आहे. देशातील एक मणिपूर 'मणि' का तुटत आहे, असा सावाल त्यांनी मोदींना केला. मणिपूरला जाण्याचे सोडाच मात्र, पंतप्रधान मोदी यावर बोलायलाही तयार नाहीत, अशी टीका देखील ठाकरे यांनी मोदींवर केली.
ईडी सीबीआयला मणिपूरला पाठवा :'मणिपूरला शांत करायचे असेल तर, त्यावर उपाय आहे. तुम्ही इतर पक्षाच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता. त्यांच्या कुटुंबाची निंदा करणे. घरांवर छापे टाकले जातात. गरीब झोपडीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी टाकता. तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयला मणिपूरला पाठवा. मणिपूरला आग लावणारे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाकामुळे तुमच्या पक्षात आले तर मणिपूर शांत होईल,' असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
पोहरादेवीचा निधी गेला कुठे :'आमदार, खासदार गेले तरी एक तगडा शिवसैनिक माझ्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस पोहरादेवीला आले. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर पोहरादेवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी दिला. मला वाटले बांधकाम होईल. इथले रस्ते स्वच्छ नाहीत. मग निधी गेला कुठे? याची चौकशी कोण करणार?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे.
भाजप खासदार भ्रष्ट : यवतमाळचे आमदार आणि खासदार दोघेही आरोपी होते. खासदारताईही पळून गेल्या होत्या. पण, एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राखी बांधतानाचा फोटो आला. आपला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र, देशभरातील तुमच्या पक्षाचे काही दलाल हे खासदार भ्रष्ट असल्याचा आरोप करतात. पंतप्रधानांनी स्वतःच्या हाताने राखी बांधली. पुढे चौकशीचे काय झाले?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला आहे.
शिवसेनेचे सरकार येणार : 'भाजपला वाटतं की आज मी एकटा आहे. पण, बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या भाजप मनातून काढू शकणार नाहीत. राजकारणात स्फोट होतात. छगन भुजबळ आमच्यासोबत होते, नंतर राष्ट्रवादीत गेले. आता ते तिकडे गेले आहेत. ही पक्ष संपवण्याची वृत्ती आहे, ती संपवायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांनी जाहीर सभांमध्ये आमच्याबद्दल बोलावे, आम्ही तुमच्याबद्दल बोलतो. जनता जे ठरवेल ते स्वीकारणे यालाच लोकशाही म्हणतात. मात्र, आता तुम्ही कोणाला मत द्या, सरकार माझ्याकडे येईल असे देखील ठाकरे म्हणाले.
पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री :आमचे ४० आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यात अपक्षांचाही समावेश आहे. 160 किंवा 165 लोकांचे मजबूत सरकार आहे. मग राष्ट्रवादीला पुन्हा पळवून नेण्याची काय गरज होती? अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अमित शहा यांनी शिवसेनेकडे ठेवण्याचा शब्द दिला होता. तेव्हाही शिवसेनेला मुख्यमंत्री व्हायचे होते. पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -Prithviraj Chavan On Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या नावावर भाजपमध्ये एकमत नाही- पृथ्वीराज चव्हाण