यवतमाळ - दुबई येथून यवतमाळमध्ये परतलेल्या 9 नागरिकांपैकी दोन जणांचे थ्रोट नमुने तपासणीत पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात आता पुन्हा एका रुग्णाचा कोरोना चाचणी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन झाली असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
'कोरोना'चा कहर : यवतमाळमध्ये आणखी एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह - वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालय
यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाचा कोरोना चाचणी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 झाली आहे. तर 37 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
'सर्व रुग्णांना वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्याच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच दुबईतील लोकांच्या संपर्कात आलेल्या 37 ते 40 नागरिकांना घरीच निगराणीत ठेवण्यात आले' असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतः जिल्हा प्रशासनाची संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.