यवतमाळ - मागील 15 वर्षांपासून विनाअनुदानीत तत्वावरील उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना अनुदान देण्यात आलेले नाही. यामुळे जिल्ह्यातील ३७५ शिक्षकांनी, 9 ऑगस्टपासून 'नो पेमेंट - नो वर्क' आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 164 महाविद्यालयातील दीड हजारवर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमचा शिक्षणाचा प्रश्न निकाली काढा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
यवतमाळच्या शिक्षकांचे 'नो पेमेंट-नो वर्क' आंदोलन; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भेटीला - विनाअनुदानित तत्वावरील शिक्षक
सन 2019-20 या शैक्षणिक सत्राच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यातील 375 विनाअनुदानित तत्वावरील शिक्षकांनी 'नो पेमेंट-नो वर्क' आंदोलन सुरू केले आहे. यामुळे 164 महाविद्यालयातील दीड हजारवर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती आहे.
सन 2019-20 या शैक्षणिक सत्रामध्ये, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी 'नो पेमेंट - नो वर्क' असा पवित्रा घेतला आहेत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. सत्राच्या सुरुवातीपासूनच शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केल्याने विद्यार्थ्यांना फक्त महाविद्यालयात येणे, दिवसभर बसणे आणि परत जाणे इतकेच काम करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला कोण जबाबदार आहे? असा प्रश्नही या विद्यार्थांनी उपस्थित केला आहे. हे टाळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी देखील या विद्यार्थ्यांनी केली आहे.
विनाअनुदानित तत्वावरील शिक्षकांनी 9 ऑगस्टपासून 'नो पेमेंट - नो वर्क' तर 16 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच मागणी पुर्ण न झाल्यास, 19 ऑगस्ट पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. आता विनाअनुदानित तत्वावरील शिक्षकांची मागणी आणि विद्यार्थ्यांची कोरी पाटी कधी निकालात निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.