यवतमाळ -राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, अद्याप खातेपाटप झालेले नाही. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी मंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीनही पक्षाला न्याय देतील, असे म्हटले आहे.
हेही वाचा... 'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील मंत्री निश्चित झाले. परंतू अद्याप काँग्रेसने आपली यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेसला ग्रामीण भागाशी निगडित ग्रामविकास आणि कृषी खाते हवे, यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी तीन पक्षांचे सरकार असून सर्वांना समान न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. तसेच खाते वाटपात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही खात्याबाबत आग्रह धरला गेलेला नाही. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री मिळून योग्य निर्णय घेतील, असे बोलत माणिकराव ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.