यवतमाळ - जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचा वेग मंदावला होता. एवढेच नाही तर 101 पैकी 94 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरीसुध्दा गेले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालपर्यंत सातवर आली होती. मात्र, बुधवारी नऊ जणांचा रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेले हे नऊ रुग्ण पुसद येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या (हाय रिस्क काँटॅक्ट) संपर्कातील असून यापैकी चार दिग्रस, चार पुसद आणि एक जण महागाव येथील आहे.
सद्यस्थितीत ते संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोव्हिड केअर सेंटर येथे भरती आहेत. पुसद येथील सुरुवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकूण 17 लोकांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यापैकी 9 पॉझिटिव्ह, 6 निगेटिव्ह आणि 2 रिपोर्ट अप्राप्त आहे. तसेच मंगळवारी होडी (ता.पुसद) येथील मृत्यू झालेल्या 55 वर्षीय गौतम कांबळे यांचे नमुने तपासणीकरिता पाठवले असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.