यवतमाळ - जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतांनाच आज(शुक्रवार) 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेले 21 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, आज जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून 14 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही 70 वर्षीय पुरुष असून पुसद येथील ज्योती नगरातील रहिवासी आहे. ते 13 जुलैरोजी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाले होते. तसेच जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील डोर्लीपुरा (पाटीपूरा) येथील एक पुरुष, भोसा येथील सारस्वती ले-आऊट येथील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन महिला, पुसद शहरातील गायमुखी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील संभाजी नगर येथील दोन महिला, पुसद शहरातील खाटीक वॉर्ड येथील दोन पुरुष, उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील गांधी नगर येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील एक महिला पॉझिटिव्ह आले आहेत.