यवतमाळ - जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात. कारण त्यांची गो-सेवा हीच मुक्या प्राण्यांसाठी लळा लावणारी ठरली आहे. मागील 25 वर्षापासून संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत त्यांचे गोरक्षणचे कार्य अविरत सुरू आहे. कधी कत्तलीसाठी जाणारे जनावरे पोलीस पकडतात तेव्हा पोलीस त्यांच्याकडे ही जनावरे आणतात. तर कधी शेतकरी यांच्याकडील वृद्ध जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून देतात आणि त्यासर्वांची स्वतः काळजी घेऊन जैस्वाल हे सांभाळ करतात.
गोरक्षनात चारशे गाई
आज त्यांच्याकडे सुमारे चारशे गाई आणि जनावरे आहेत. गावाकडे ग्रामस्थांना महागाईच्या काळात सध्या जनावरे पालन करणे कठीण झाले आहे. अशावेळी काही व्यक्ती त्यांच्याकडील जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून सोडतात. खरे तर प्रत्येकाने एक दोन गाईंचे पालन केल्यास गाव खेड्यात शेती परिसर नंदनवन होईल, असा विश्वास जैस्वाल यांना आहे. यासाठी प्रत्येकाने गाईचे पालन करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. आजारी असलेल्या गाईंची येथे नीट काळजी घेतली जाते.