यवतमाळ - कोरोनाचे संकट हे एका युध्दासारखे आहे. या संकटातून लोकांचा जीव वाचविणे हेच आमचे दायित्व आहे. रेकॉर्डला असलेलेच आकडे आपल्याला दिसतात. मात्र काही नागरिकांचा कोरोनाच्या भीतीमुळे घरातचं मृत्यू झाला आहे. असे आकडे समोर येत नाही. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर कमी करायचा असेल तर लोकांच्या मनातून कोरोनाबाबतची भीती पूर्णपणे दूर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. नाना पटोलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा घेतला.
कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यू नव्हता. मात्र यवतमाळचा मृत्युदर आज 3.1 टक्के आहे. याबाबत पटोलेंनी खंत व्यक्त केली. नाना पटोले म्हणाले, 2.8 टक्के हा सरासरी मृत्यूदर आहे. त्यापेक्षा मृत्युदर जास्त असणे हे आपले अपयश आहे. हा दर कमी करण्यासाठी लोकांच्या मनातून कोरानाबाबतची भीती घालविणे, हे प्रशासनाचे पहिले प्राधान्य असले पाहिजे. कोरोना हा आजार फुफ्फुसाशी निगडीत आहे. फुफ्फुसाला दुसरा पर्याय नाही. तीन– चार दिवस हा आजार अंगावर काढला तर आपले काहीही होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमधून मी गेलो आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच आपली चाचणी करून घ्यावी. जिल्ह्यात चाचण्या करण्याची प्रक्रिया वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.