यवतमाळ -भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेचा दुसरा टप्पा यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून सुरू झाला. सरकारच्या सर्व योजना आणि आश्वासने फसवे असल्याचा आरोप महापर्दाफाश यात्रेचे प्रमुख नाना पटोले यांनी केला.
सरकारने एकही योजना पूर्ण केली नाही म्हणूनच ही महापर्दाफाश यात्रा काढावी लागली. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी, बेरोजगारी याबाबत जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेले नाहीत. हे सरकार लबाडांचे आहे. महाजनादेश यात्रा काढून जनतेच्या कष्टाचा पैसा खर्च करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यावर निशाणा साधला. बाभूळगाव तालुक्यातील एक प्रकल्प 2006 मध्ये आघाडी सरकारने मंजूर केला होता. मात्र, तो प्रकल्प या सरकारने रद्द केला. ही बाब आपल्या मतदारसंघातील मंत्री अशोक उईके यांना माहीत नाही, ही शोकांतिका आहे. हेच मंत्री महोदय गेल्या वीस वर्षांत जे झाले नाही ते मी पाच वर्षांत केले, असे सांगत फिरत आहेत.