यवतमाळ -नागपूर-तुळजापूर या महामार्गाचे काम सुरू असून यामुळे या महामार्गावरिल पाणी घरात शिरत असल्याने संतप्त झालेल्या भांबराजा येथील नागरिकांनी जाळपोळ करून रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नागपूर-तुळजापूर मार्गावर भांबराजा हे गाव आहे. या महामार्गाच्या कामामुळे पावसाळ्यातील पाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. हे पाणी गावालगत असलेल्या नाल्यात जाऊन ते पाणी गावात शिरत आहे. संततधार पावसामुळे गावाशेजारील असलेल्या नाल्यात महामार्गचे पाणी जाऊन गावातील जवळपास चाळीस घरात शिरले.
स्थानिकांनी बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले. महामार्गावर जाळपोळ करून शेकडो नागरिकांनी ठिय्या मांडला. आंदोलनामुळे या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.