यवतमाळ -नागपूर-तुळजापूर मार्गावरील आर्णी तालुक्यातील जवळा या गावाजवळ एसटी बस व आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की आयशरने दिलेल्या धडकेत बस अर्धी चिरली होती. यात तीन जण गंभीर जखमी तर बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (शनिवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. जखमींना आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. बसमध्ये 21 प्रवासी प्रवास करीत होते.
थरारक अपघातात बस अर्धी चिरली बस आली विरुद्ध दिशेने -
दारव्हा आगाराची बस (एमएच 40 एन 8078) ही बस आर्णीकडे जात होती. नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील जवळा गावाजवळ ही बस विरुद्ध दिशेने आली. समोरून येत आयशर ट्रॅक (एमएच 45 एएफ 4273) ने या एसटी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात बस अर्धी चिरली आहे.
तीन गंभीर, 12 जण जखमी -
बस चालक रमेश बुचके (58), प्रवासी अनंत रामटेके आणि सुशील मूनमुले हे गंभीर जखमी झाले आहेत. तर दिव्यांग रामटेके (4), अनिता जाधव(45), विमल मुजमुले( 70), नम्रता डोळस(22), विष्णू इंगोले( 47), अंकित चांडक(28), ज्योती राठोड(32), नयना राठोड(5), अनुसया इंगोले(55), विलास काळे(40), विठ्ठल पिंपळकर( 63), नागोराव जगताप हे किरकोळ जखमी झाले.