यवतमाळ -धारणी-अचलपूर-अमरावती-नेर-यवतमाळ-करंजी या रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार असल्याने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित करून या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
टेक्सटाइल पार्कला होणार उपयोग
विदर्भातील अमरावती व यवतमाळ हे दोन्ही जिल्हे कापूस उत्पादक आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (पेठ) येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून तेथे टेक्सटाइल पार्क होत आहे. या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील टेक्सटाइल पार्कला कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे. तीन राज्यांना जोडणारा हा रस्ता महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा आंतरराज्यीय रस्ता आहे. रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग 47 खांडवा (मध्यप्रदेश) येथे प्रारंभ होऊन रा. म. क्र. 548 सी (सतार-बैतुल)-परतवाडा, रा. म. क्र. 353 जे (मोर्शी-अचलपूर)-अचलपूर, रा.म.क्र. 53 (नागपूर-सुरत)-बडनेरा/अमरावती, रा. म. क्र. 753-सी (वर्धा-औरंगाबाद)-शिवनी, रा. म. क्र. 361 (नागपूर-तुळजापूर)-- यवतमाळ व रा. म. क्र. 44 (नागपूर-हैदराबाद)-करंजी या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा उत्तर-दक्षिण असा महामार्ग आहे. एकूण लांबी अंदाजे 300 किमी रस्त्याची एकूण लांबी अंदाजे 300 किमी असून त्यापैकी 190 किमी लांबी अमरावती जिल्ह्यातून व उर्वरित लांबी 110 किमी ही यवतमाळ जिल्ह्यामधून जाते.
विकासासाठी महत्त्वाचा रस्ता
विदर्भ, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या प्रदेशांच्या आर्थिक भौगोलिक विकासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावित रस्ता अधिसूचित आदिवासींना संपर्क साधेल, तसेच अमरावती जिल्ह्यामधील धारणी तालुक्यातील गावे मुख्य भूभागापर्यंत, चिखलदारा पर्यटनस्थळाला महत्त्वाचा दुवा ठरेल. तरी सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी खासदार गवळी यांनी केली आहे.