महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार वर्षाच्या मुलाला कीटकनाशन पाजून मातेची आत्महत्या, यवतमाळमधील घटना - यवतमाळ आत्महत्या बातमी

चार वर्षीय चिमुकल्याला कीटकनाशक पाजून मातेने आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी मृत आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 23, 2020, 9:06 PM IST

यवतमाळ - पिकांवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशन चार वर्षीय चिमुकल्याला पाजून आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी येथे घडली. याबाबत बिटरगाव पोलीस ठाण्यात रविवारी (23 ऑगस्ट) मृत आईविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सम्राट विशाल रणमले (वय 4 वर्षे) व सविता विशाल रणमले (वय 32 वर्षे, दोघे रा. कुपटी, ता. माहुर), अशी मृत माय-लेकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, माहुर तालुक्यातील कुपटी येथील विशाल रणमले याने पत्नी सविता हिला चार वर्षीय चिमुकला सम्राट याच्यासह नागपंचमीसाठी तिच्या माहेरी उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी येथे पाठविले होते. ती आज (23 ऑगस्ट) भाऊ पवन मुकाडे याच्यासोबत शेतात गेली होती. यावेळी सविताचा भाऊ पवन हा शेतातील पिकांवर फवारणी करीत होता. तर फवारणीचे औषध त्याने शेतातील एका टाकीजवळ ठेवले होते. दरम्यान ते विषारी औषध सविताने चार वर्षीय चिमुकला सम्राटला पाजले. त्यानंतर स्वत:ही प्राशन केले. काही वेळातच भाऊ पवन हा फवारणी आटोपून सविताकडे गेला असता ती शेतातील टाकीजवळ पडलेली दिसली.

तिच्याच बाजूला चार वर्षीय सम्राट देखील पडलेला होता. यावेळी पवनने विचारपूस केली असता सविताने सम्राटला विषारी औषध पाजून स्वत:ही पिले असल्याचे सांगितले. घटनेची माहिती कुटूंबीयांसह गावकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर दोघांनाही प्रथम फुलसांगवी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सावना येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, त्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण बिटरगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी सविताचा भाऊ पवन मुकाडे (रा. अनंतवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरुन सविताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिटरगाव पोलीस करत आहेत.

हेही वाचा -यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ABOUT THE AUTHOR

...view details