यवतमाळ -दारव्हा तालुक्यातील बोरी येथे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करण्यासाठी स्टेट बँक गेल्या 6 महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. काल(7 डिसेंबर) मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार आणि अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बोरी स्टेट बँकेवर धडक दिली. यावेळी, बँक व्यवस्थापक चावरे यांना २ तास घेराव घालण्यात आला. दरम्यान, एका महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी चावरे यांनी दिले आहे.
चावरे हे वशिलेबाजीने लोकांची कामे करतात आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय काम करत नाही, अशा स्वरूपाचे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मनसेने काही कर्ज प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता न करताच मंजूर केल्याचा आरोप बँकेवर केला आहे. या प्रकारचे एक उदाहरणदेखील त्यांनी यावेळी दिले. गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास 720 कर्ज खाते पुनर्गठन प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.