यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड आज सकाळी नागपूर मार्गे मुंबईला कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र, कोरोना काळात त्यांच्या या अशा प्रकारच्या शक्ती प्रदर्शनावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर आता वनमंत्री संजय राठोड यांनी शरद पवाराच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राठोड मंत्रिमंडळ बैठकीला रवाना पवारांच्या नाराजीवर बोलण्यास नकार-
वनमंत्री राठोड आज सकाळी मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सगळे सुरळीत झाले असून मी माझ्या कामकाजाला आजपासून सुरुवात करीत असल्याचे स्पष्ट केले. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत वनमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले होते. मात्र, त्यावर मला काहीही बोलायचे नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कार्यकर्त्यांना न येण्याचे आवाहन, तरीही गर्दी-
पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता, 'मी लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, कार्यकर्त्यांची गर्दी जमली. नागरिक अजूनही गंभीरपणे कोरोनाला घेत नाही आहे. मात्र आजपासून मी माझ्या कामकाजाला सुरुवात करीत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.