यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. वडिलांच्या उपचारासाठी जमीन विकून पैसे जमा केलेल्या तरुणाला काय करावे, असा प्रश्न पुढे आहे. अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांचे घामाचे पैसे बँकेतील चार अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर काढल्याच्या शंभरांहून तक्रारी आहेत. हा जवळपास चार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा आहे.
डॉक्टरांनी प्रतीक सोळंकी या तरुणाला त्याच्या वडिलांवर बायपास सर्जरी करायला सांगितली. यासाठी जवळपास सहा लाख खर्च सांगितले. पैसे कुठून आणावे, कुणाला मागावे अशा विवंचनेत जवळ असलेली त्याने तीन एकर शेती साडेअकरा लाखांत विक्री केली. हा पैसा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेत जमा केला. पुढच्या महिन्यात मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्याचे ठरविले. यासाठी बँकेतून मुंबईच्या हॉस्पीटल ट्रान्स्फर करण्यासाठी गेल्यानंतर बँकेच्या खात्यातून साडेआठ लाख रुपये गहाळ झाल्याने त्याला धक्का बसला. ही आपबीती तरुणाने डोळ्यात पाणी आणून सांगितली.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा
हेही वाचा-जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा.. शाखा व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हे; अफरातफर दीड कोटींच्या घरात
आर्णी येथीलच महेंद्र अरणकर हे 2002 पासून या बँकेत खातेदार आहेत. शेतीतील उत्पादन, कापूस, तूर, चना, सोयाबीन या पिकांतून आलेले पैसे हे मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा करीत असतात. यावर्षी विकलेल्या कापसाचे चार लाख रुपयेही त्यांनी बँक खात्यात जमा केले होते. यातील तीन लाख रुपयांची त्यांनी नातेवाइकांची उधारी चुकती केली. तर एक लाख आठ हजार खात्यात जमा होते. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो असता खात्यात केवळ एक हजार आठ रुपये शिल्लक दिसल्याने ते हादरून गेले.
हेही वाचा-मालमत्ता कर वसुलीत वरळीत १०० तर मुंबईत ८०० कोटींचा घोटाळा; काँग्रेसची चौकशीची मागणी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्णी शाखेमध्ये 19 हजार खातेदार आहेत. यात शेतकरी, व्यापारी, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे खाते आहे. यात जास्त रक्कम असलेल्या खात्यातून खोटे बनावट दस्तऐवज तयार केले. तसेच ग्राहकांच्या बचत खात्याच्या पुस्तकावर स्वतःच्या हाताने नोंदी करून खोटे हिशोब तयार केले. सुरुवातीला 27 हजार रुपयांचा घोळ निदर्शनास आल्याने बँकेकडून प्रत्येक खातेदारांची खात्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा हा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
चौघांवर गुन्हा दाखल
आर्मी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात घोटाळा झाल्याचा प्रकार निष्पन्न झाल्याचे व्यवस्थापक रंजीत गिरी यांना आढळले. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शाखेच्या व्यवस्थापक योगिता पुस्तके लेखापाल अमोल मुजमुले, रोखपाल विजय गवई व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.