यवतमाळ- थकीत हप्त्याच्या मोबदल्यात शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घाटजी तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. शरीर सुखास नकार दिल्याने संबंधित वसुलीदाराने आपल्यावर अतिप्रसंग केल्याचाही आरोप पीडितेने तक्रारीमध्ये केला आहे. घाटंजी तालुक्यातील लहान मोवाडा गावात ही घटना घडली आहे.
सुरेश गजभिये (रा. यवतमाळ) ,असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेचा पती मानसिक रुग्ण असल्याने ती स्वत:च संपूर्ण व्यवहार करते. शेतीकामासाठी बँकेकडून वर्षापूर्वी कर्ज काढत ट्रॅक्टर घेतला होता. त्या कर्जाचे दोन हप्ते देखील भरले होते. थकीत हप्त्यासाठी बँकेतून काहीजण वसुलीसाठी आले होते. त्यावेळी घरामध्ये विचारणा केली असता, घरात पीडितेचा मुलगा, मुलगी आणि बहीण उपस्थित होते. त्यामुळे मुलाने पैशाचे सर्व व्यवहार आई बघते म्हणत आईशी बोलणी कऱण्यासाठी आई काम करत असल्याल्या शेतात घेऊन गेला. त्यावेळी वसुलीदाराने महिलेला घरी चला कर्जाबाबात बोलायचे आहे, असे सांगितले. दरम्यान, सुरेश सोबत आलेल्या अन्य व्यक्तींनी त्यांचा थकबाकीपोटी ट्रॅक्टर घेऊन गेले असल्याचे पीडितेच्या मुलीने पीडितेला घरात सांगितले.