यवतमाळ - उत्तर प्रदेश येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्र बंद केला. या बंदला जिल्ह्यातील सर्वात जास्त उलाढाल असलेल्या बाजार समितीने पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून निषेधही नोंदविला. परंतु जिल्ह्यातून सोयाबीन व इतर धान्य विक्रीसाठी आणत असलेल्या शेतकऱ्यांची कुठलीही अडचण होऊ नये यासाठी बाजार समितीत व्यवहार सुरू ठेवले होते.
यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला सध्या पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, धामणगाव, देवळी, हिंगणघाट, वाशिमब या जिल्ह्यातून शेतकरी शुक्रवारपासून सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्याने आजही बाजार समिती बंद ठेवली तर शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच बाजार समिती प्रशासनाने खेरदि सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बाजार समितीमध्ये दिवसाला साडेतीन ते चार हजार क्विंटल सोयाबीनची सध्या आवक सुरू असून दरही चांगला मिळत आहे.