यवतमाळ- विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले असून आता सर्वांचे लक्ष गुरूवारी होणाऱ्या मतमोजनीकडे लागले आहे. जिल्ह्यात एकूण ७ मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत ६६.२०% मतदान झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ७ जागांपैकी भाजपला ५ जागा जिंकण्यात यश आले होते. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळवता आली. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील ७ ही मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस भूईसपाट झाली होती. यंदा भाजपला आपल्या जागा टिकवता येईल की, जिल्ह्यात पुन्हा आघाडीचे राज्य येईल, हे उद्याच्या निकालात स्पष्ट होईल.
दरम्यान, जिल्ह्यातील यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार व काँग्रेसचे बाळासाहेब मांगळूरकर यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. तर पुसद मतदारसंघातील भाजपचे निलय नाईक आणि राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक या दोघा भावांमध्ये चुरशीची लढत आहे. सद्याचे चित्र पाहता पुसद हा विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गड आहे. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकविण्यासाठी या मतदारसंघात विजय मिळविणे हे राष्ट्रवादीसाठी महत्वाचे झाले आहे. त्यामुळे यवतमाळ आणि पुसद या दोन्ही जागांवर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-यवतमाळमध्ये मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त
वणी मतदारसंघ आढावा
२०१४ साली विधानसभा निवडणुकीत वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी ४५ हजार १७८ एवढी मते घेत विजय मिळवला होता. त्यांची लढत शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांच्याशी होती. यंदा वणी मतदारसंघात ७३.०४ % मतदान झाले आहे. भाजपकडून संजीव रेड्डी बोदकुरवार, काँग्रेसकडून विमानराव बी कासवार, वचितकडून डॉ. महेंद्र लोढा तर मनसेकडून राजू उंबरकर मतदारसंघात लढत आहेत. सद्याचे चित्र पाहता मतदारसंघात वरिल सगळेच उमेदवार तुल्यबळ असल्याने त्यांच्यापैकी कोणाचा विजय होईल, याबाबत संभ्रम आहे.
राळेगाव मतदारसंघ -
२०१४ साली विधानसभा निवडणुकीत राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. अशोक उईके यांनी १ लाख ६१८ एवढी मत घेऊन विजय मिळवला होता. त्यांची लढत काँग्रेसचे वसंत पुरके यांच्याशी होती. यंदा राळेगाव मतदारसंघात ६५.२० % मतदान झाले आहे. भाजपकडून अशोक उईके, काँग्रेचे वसंत पुरके, वंचितचे माधव कोहळे लढत आहे. सद्याचे चित्र पाहता मतदारसंघात कर्जमाफी, बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. भाजपचे अशोक उईके व काँग्रेसचे पुरके यांच्या थेट लढत आहे.
यवतमाळ मतदारसंघ आढावा
२०१४ साली विधानसभा निवडणुकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मदन येरावार यांनी ५३ हजार ६७१ एवढी मत घेऊन विजय मिळवला होता. त्यांची लढत शिवसेनेचे संतोष ढवळे यांच्याशी होती. यंदा यवतमाळ मतदारसंघात ५५.४२% मतदान झाले आहे. भाजपकडून मदन येरावर, काँग्रेसकडून बाळासाहेब मंगळूरकर, वंचितचे योगेश पारवेकर यांच्यात लढत आहे. सद्याचे चित्र पाहता मतदारसंघात भाजप व काँग्रेसच्या उमेदवारंमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक जिल्ह्यात प्रचारासाठी आले होते. त्यांनी भाजपवर सनसनीत टीका केली होती. भाजप आणि शिवसेना धर्म आणि जातीच्या नावाखाली समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करत आहे. या माध्यमातून मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या प्रचाराचा काँग्रेसला किती फायदा होतो हे बघण्यासारखे राहील.