यवतमाळ- भीषण पाणीटंचाईने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने राळेगावातील नागरिकांनी निकृष्ट पाणीपुरवठा योजनेची अंत्ययात्रा काढली. यावेळी मुंडन करून उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राळेगाव शहर पाणीटंचाईग्रस्त समिती, आसरा सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी झाले.
यवतमाळमधील राळेगावात महिलांनी काढली निकृष्ट पाणीपुरवठा योजनेची अंत्ययात्रा - यवतमाळ
राळेगावातील नागरिकांनी निकृष्ट पाणीपुरवठा योजनेची अंत्ययात्रा काढली. यावेळी मुंडन करून उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.
शहराच्या विविध भागातून ही अंत्ययात्रा वाजत-गाजत फिरविण्यात आली. यावेळी महादेव लांबडे यांनी मुंडन करून या अंत्ययात्रेचे आकटे पकडले. पाणीटंचाईची समस्या त्वरित सोडण्यात आली नाही, तर यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही महिलांनी यावेळी प्रशासनाला दिला.
उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये राळेगाव शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, वारा बायपास ते पाणी टाकीपर्यंतची पाईपलाईन सिमेंट रोडने दबली आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून ती पाईपलाईन बसून घेण्याचे निर्देश देण्यात यावे, रावेरी पॉईंट ते नगरपंचायत मागील पाणी टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी, निकृष्ट पाईपलाईनची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, मंजूर 85 हातपंपांची कामे त्वरित सुरू करण्यात यावी, शिवारातील 38 सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्यावर मोटरपंप बसवून वार्डात पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, प्रत्येक वार्डामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्नेहा उबाळे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक शशिकांत धुमाळ, प्रकाश खुरसंगे, अन्वर पठाण, दीपक कोडापे सुधाकर हिवरे, वंदना भोयर, लता भोयर, दीक्षा नगराळे आदींसह गावातील महिला, गावकरी उपस्थित होते.