यवतमाळ -शहरात 7 देशीकट्टे, 118 जीवंत काडतूसे, 17 चाकू, 7 तलवारी अशा शस्त्रसाठ्यासह २२ दुचाकी, असा १४ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. यामधून जिल्ह्यातील ८ घरफोडीचे, तर ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
यवतमाळमध्ये ११८ जीवंत काडतुसांसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त गेल्या २ महिन्यामध्ये जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे काही संशयित पुसद येथील अनुप्रभा हॉटेलजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अमजद खान सरदार खान (28, रा. पुसद), देव ब्रम्हदेव राणा (22, रोहतक, हरियाणा), मोहम्मद सोनू मोहम्मद कलाम (19, रा. कलासन, बिहार) यांना ताब्यात घेतले. अमजद खान याच्या घरझडतीमध्ये 6 देशीकट्टे, 115 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
हे वाचलं का? - पंढरीतील गुन्हेगारांची पोलिसांकडून 'नाकाबंदी'; ५५ गुन्हेगार हद्दपार
दरम्यान, दिग्रस शहरात सापळा रचून मोहम्मद आसीफ मोहमद अफजल (27, रा. दिग्रस), सागर रमेश हसनापुरे(22, रा. मंगरूळ दस्तगीर) यांच्याकडून 1 देशी कट्टा, 3 काडतूस, 17 धारदार चाकू, 7 तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच चोरी व 8 घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांनी 8 घरफोडी व 6 चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडे केलेल्या चौकशीदरम्यान कुख्यात दुचाकी चोर लखन राठोड (रा. मोरगव्हाण, ता. दारव्हा) हा देखील पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 12 दुचाकी यवतमाळ जिल्हा, 2 वाशिम, 2 बुलडाणा येथील गुन्ह्यातील आहेत. कुख्यात 6 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 14 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.