यवतमाळ-विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत जिल्ह्यात रंगत निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज महाविकास आघाडीने 'आम्ही 350 पार' असा नारा देत एकजुटीची शपथ घेतली. ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असून उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना जिंकून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी मतदारांना केले.
हेही वाचा-'आर्थिक विषयांवर केंद्र सरकारचं वागण एखाद्या दारुड्यासारखं'
राज्यात सत्ता स्थापनेवेळी महाविकास आघाडीने 'आम्ही 162' असे म्हणत एकजुटीची शपथ घेतली होती. त्याच पध्दतीने यवतमाळ विधान परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी 'आम्ही 350 पार' अशी शपथ पक्ष प्रमुखांचे स्मरून करुन घेण्यात आली. यावेळी राज्याचे वन मंत्री संजय राठोड, कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे, विजय दर्डा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी मंत्री मनोहर नाईक, आमदर इंद्रनील नाईक, आमदर ख्वाजा बेग, आमदर वजाहत मिर्झा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे मातबर नेते सहभागी झाले होते.
ही निवडणूक प्रतिष्ठेची असून उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना जिंकून द्यावे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी मतदारांना विनंती केली. तर भाजपचे 50 ते 60 मतदार आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विधान परिषदची निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. मात्र, मतदार फोडाफोडीचे राजकारण या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.