यवतमाळ- जिल्ह्यातील शेतकरी कपाशी पिकाकडे मोठ्या आशेने बघतात. त्याच पिकात आता बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकरी हादरून गेला आहे. अतिवृष्टीमुळे हातचे सोयाबीन गेले. त्यामुळे, आता कपाशीवर शेतकऱ्यांची मदार होती. त्यालाही बोंडअळीचा डंख बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.
जिल्ह्यात ९ लाख हेक्टरपैकी साधारण ५ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. आता कापूस वेचणीला सुरवात होत असताना बोंडअळीने कपाशीला डंख मारला. कळंब तालुक्यातील पारडी गावातील अशोक दरने यांनी ४ एकर शेतात एकरी २० हजारांचा खर्च केला आहे. त्यांच्या शेतातील सर्व पीक बोंडअळीने बाधित झाले आहे.
कोठा गावातील राहुल कदम याचेही तेच हाल आहेत. त्यांच्या शेतातील कपाशीचे बोड बोंडअळीमुळे सडले आहेत. त्यामुळे, यंदा काही उत्पन्न होणार नाही, असे त्यांनी सांगितले. पारड गावातील भाग्यश्री पिसे या महिलेने मक्त्याने ६ एकर शेती केली. त्यांचेही पीक नष्ट झाल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
बोंडअळीच्या हल्ल्यामुळे कपाशी पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, यंदा उत्पन्नात मोठी घट येणार आहे. पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. मात्र, आता हातचे पीक गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
हेही वाचा-यवतमाळमध्ये सोयाबीन कापणीला वेग; यांत्रिकी पद्धतीवर शेतकऱ्यांचा भर