यवतमाळ- विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षांकडून इच्छुक ८६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
काँग्रेसकडून ७ मतदारसंघासाठी ८६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष नाना गावंडे (नागपूर), माजी आमदार बबनराव तायवाडे, श्यामबाबू उमाळकर (निरीक्षक), जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
वणी विधानसभेसाठी १८, राळेगाव विधानसभेसाठी १३, यवतमाळ विधानसभेसाठी १७, दारव्हा दिग्रस विधानसभेसाठी ८, आर्णी केळापुर विधानसभेसाठी ८, पुसद विधानसभेसाठी ९ तर उमरखेड विधानसभा संघासाठी १३ अशा ८६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे लोकप्रतिनिधी, उमेदवार पक्षांतर करीत असताना यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ८६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये जिल्ह्यातील माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या सव्वालाखे या जेष्ठ नेत्यासोबतच दुसऱ्या फळीतील बाळासाहेब माणगुळकर, प्रवीण देशमुख, संजय ठाकरे, बाबासाहेब गाडेपाटील, देवानंद पवार, अरुण राऊत, सिकंदर शहा यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.