यवतमाळ -भरदिवसा घरफोडी करणारी बुलडाणा जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीला यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात असलेले 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.
यवतमाळमध्ये घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चोऱ्या तत्काळ उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा सुगावा लावण्यासाठी या पथकाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्याचे अभिलेख पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती घेत असतानाच 15 ऑक्टोबर 2019 ला पुसद शहरातील शिवाजी नगर व श्रीनगर या भागात अवघ्या ४ तासामध्ये पाच बंद घरे फोडून दिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे घरफोड्या करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पथकासमोर होते.
हे वाचलं का? - चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना
तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारे आरोपी हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने चार ते पाच दिवसांपासून वेशांतर करून मेहकर येथे तळ ठोकला. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे टोळी प्रमुख किशोर वायाळ (रा. मेरा. ता. मेहकर, जि. बुलडाणा), आकाश प्रकाश पवार व राजू इंगळे (रा. बऱ्हाई ता. मेहकर जि. बुलडाणा) अशा ३ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड हद्दीत 11 ठिकाणी दिवसा घरफोड्या केल्याची कबुल दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली 1 कार, 2 मोटार सायकल, 97 ग्राम सोने व 550 ग्राम चांदी असा एकूण 8 लक्ष 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हे वाचलं का? - तोतया पोलीस निघाले सोनसाखळी चोर; साडेआठ लाखांचे सोने जप्त
कुख्यात किशोर वायाळ या आरोपीविरूध्द संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यात अंदाजे 150 वर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नमुद कुख्यात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पुसद शहर पोलीस स्थानक येथील दिवसा घरफोडीचे 8 गुन्हे, महागाव, वसंतनगर व उमरखेड येथील प्रत्येकी 1 असे घरफोडीचे एकूण 11 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी ही कारवाई केली.