यवतमाळ -जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कापूस आणि सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता कापसावर बोंड अळीचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बोंड अळीमुळे कापसाचे पीक वाया गेल्याने ते उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. झरीजामनी तालुक्यातील नारायण गोडे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील तब्बल 5 एकर पिकावर नांगर फिरवला आहे.
कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भा नारायण गोडे यांनी सात एकरमध्ये कपाशीची लागवड केली होती. त्यांना यासाठी तब्बल 1 लाखांच्या आसपास खर्च आला होता. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पीक वाया गेल्याने त्यांचं मोठं नूकसान झाले आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पिकावर नांगर फिरवतांना त्यांना अश्रू अनावर झाले. बोंड अळ्यांच्या प्रार्दुभावामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाही.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांचा निर्णय
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या सोयाबीन पिकात कुठे जनावरे सोडली तर महागावच्या शेतकऱ्याने आपले उभे सोयाबीन पीक जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी नेरच्या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कपाशीवर ट्रॅक्टर फिरवल्याची घटना घडली होती. कपाशी आणि सोयाबीनचे पीक तर गेले मात्र, रब्बी हंगामातील पीक तरी व्हावे यासाठी शेतकरी असे निर्णय घेत आहेत.
कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेशच नाहीत
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहेत. कुठल्याही शेतात गेलं तर कपाशीच्या 60 ते 70 बोंडांपैकी किमान 50 ते 60 बोंडामध्ये गुलाबी बोंड अळी निदर्शनात येत आहे. या संदर्भात कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. कृषी विभागाचे अधिकारी शेतात जाऊन पाहणी करत आहेत. मात्र शासनाकडून पंचनाम्याचे अधिकृत आदेश नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.