यवतमाळ- आर्णी तालुक्यातील इचोरा हे तीन हजार लोकवस्तीचे गाव. या गावात नाली बांधकाम, संरक्षण भिंत आणि पुलाचे असे जवळपास अडीच कोटीचे कामे करण्यात आले आहे. मात्र, या कामात भ्रष्टाचार झाला असून ही सर्व कामे पन्नास लाखातच आटोपण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संबंधीची तक्रार गावातील प्रा.अजय राठोड यांनी ग्रामसेवकापासून तर मंत्रालयापर्यंत केली आहे. मात्र, याची कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याने, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
रोजगार हमीतून झाली कामे
ईचोरा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गावामध्ये अनेक विकासात्मक कामे हातात घेण्यात आली. यात वृक्ष लागवड, उघडी गटार, पूर संरक्षण भिंत बांधकाम असे जवळपास अडीच कोटींची कामे गेल्या एक वर्षापासून या गावात सुरू आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून संबंधित ठेकेदारांनी ही सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली आहे. पूर संरक्षण भिंतीमध्ये मोठ्या दगडांचा वापर, तर नाल्यामध्ये निकृष्ट साहित्य वापरले आहे, तर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. अशी सर्वे कामे ठरलेल्या किंमतीनुसार न झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.