यवतमाळ - सद्यस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस मिश्र खतांचे उत्पादन व विक्री होत आहे. कृषी विभागातील काही भ्रष्ट अधिकारी या बोगस खत उत्पादकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या उत्पादकांवर तातडीने कठोर कार्यवाही करून उत्पादन व विक्रीवर प्रतिबंध घातला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले. शेतकर्यांची फसवणूक करणार्यांना अधिकार्यांनी दया दाखवू नये, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश नाना पटोलेंनी दिले असल्याची माहिती देवानंद पवार यांनी दिली.
राज्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना कृषीमाल उत्पादकांकडून शेतकर्यांची होणारी फसवणूक हेसुद्धा एक मुख्य कारण आहे. कृषी विभागातील भ्रष्ट अधिकार्यांच्या पाठबळामुळे राज्यात बोगस मिश्रखते विकली जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून खतांच्या नावाखाली मातीमिश्रीत खते विकले जात आहेत. खत उत्पादकांवर कृषीच्या गुणनियंत्रक विभागातील अधिकार्यांची मेहरबानी असल्याने हा व्यवसाय सुरू आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना २४ फेब्रुवारीला निवेदन दिल्याची माहिती पवार यांनी दिली.