यवतमाळ -स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद पोट निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले. आता उमेद्वारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 4 फेब्रुवारीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ विधान परिषद पोट निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान हेही वाचा -मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आतमध्ये नेण्यास मनाई
निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी, तर भाजपकडून सुमित बाजोरिया यांच्यात थेट लढत झाली. जिल्ह्याच्या वणी, राळेगाव, केळापूर, यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड या सात मतदान केंद्रावर 489 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता कोणाचा विजय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा -यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; मतदारांची पसंती आघाडी, की भाजपला?
या निवडणुकीत मतविभाजन होऊ नये म्हणून मतदारांना महाविकास आघाडी आणि भाजपकडून बाहेरगावी पाठवण्यात आले होते. आज याच मतदारांनी विशेष गाडीतून सकाळी मतदान केंद्रावर दाखल होत मतदान केले. 2016 मध्ये येथून शिवसेनेचे तानाजी सावंत जिंकून आले होते. मात्र, आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे भूम परंडा मतदारसंघातून जिंकून आल्याने यवतमाळला विधान परिषद पोट निवडणूक झाली.
हेही वाचा -यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
या निवडणुकीची 4 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीचा कार्यकाळ हा डिसेंबर 2022 पर्यंत राहणार आहे. दारव्हा मतदान केंद्रावर 44 मतदान, यवतमाळ केंद्रावर 180, पुसद मतदान केंद्रावर 57, राळेगाव मतदान केंद्र 37, उमरखेड मतदान केंद्र 62, केळापूर मतदान केंद्र 60, वणी येथील मतदान केंद्रावर 49 असे एकूण 489 म्हणजे 100 टक्के मतदान झाले.